मुंबई – ‘कोई मिल गया’पासून सुरू झालेल्या हृतिकच्या करिअरमध्ये ‘क्रिश’च्या फ्रॅंचाईजीचा मोठा वाटा आहे. या फ्रॅंचाईजीच्या माध्यमातून राकेश रोशन यांनी आपल्या चिरंजीवांना बॉलीवूडमधील पहिला सुपर हिरो म्हणून पडद्यावर आणले. या फ्रॅंचाईजीचे आतापर्यंत 3 भाग येऊन गेले आहेत. आता राकेश रोशन ‘क्रिश 4’ची तयारी करत आहेत. ‘क्रिश 4’बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही. मात्र त्याबाबतची चर्चा मात्र खूप होते आहे. आगोदरच्या तिन्ही भागांप्रमाणे ‘क्रिश 4’ हा देखील एक मेगा बजेट सिनेमा असणार आहे. यामध्ये हृतिकबरोबर दीपिका पदुकोण दिसणार आहे, असे समजते आहे. राकेश रोशन आणि दीपिकामध्ये या संदर्भातील चर्चाही झाली आहे, असे समजते आहे. दीपिकाच्या आगोदर कियारा आडवाणी आणि कृती सेननबरोबर देखील या संदर्भात चर्चा होऊन गेली होती. मात्र या दोघींचीही निवड फायनल होऊ शकलेली नाही. त्यामुळे दीपिकाच्या निवडीबाबतही काहीही ठामपणे सांगता येऊ शकणार नाही. स्वतः राकेश रोशन यांच्या म्हणण्यानुसार आता केवळ स्क्रीप्टवर काम सुरू आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, की ‘क्रिश-4’मध्ये हृतिक हिरोबरोबर व्हिलनचाही रोल साकारणार आहे. म्हणजे कदाचित त्याचा डबल रोल आपल्याला बघायला मिळणार आहे.