आज दीपावली पाडवा : पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी करणार प्रार्थना

पिंपरी – दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवांपैकी चौथा दिवस असलेल्या दीपावली पाडव्याचा सण बुधवारी (दि. २१) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवसाला बलिप्रतिपदा असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी राजा महाबली पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेची भेट घेतो, म्हणूनच हा दिवस भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो.
राजा बली हा अत्यंत दानशूर आणि प्रजेचा लाडका राजा होता. त्याच्या दानशूरतेमुळे देवताही त्रस्त झाल्या. तेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि तीन पावलांमध्ये त्रिलोक व्यापून राजा बलीला पाताळात पाठवले. मात्र बलीच्या भक्तीने विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला दरवर्षी एक दिवस पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेची भेट घेण्याची परवानगी दिली.
तो दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा असल्याची दंतकथा आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. व्यापारी वर्गासाठी हा दिवस नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी नवीन हिशेब वही (लेखी पुस्तके) सुरू करण्याची परंपरा आहे. ग्रामीण भागात गोवर्धन पूजा आणि गोधन पूजनही केली जाते.
महाराष्ट्रात दीपावली पाडवा हा पती-पत्नीच्या स्नेहाचा दिवस मानला जातो. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी औक्षण करतात, तर पती पत्नीला भेटवस्तू देतात. घराघरात राजा बलीची पूजा, गोडधोड पदार्थ आणि उत्सवी वातावरण दिसून येते. काही ठिकाणी या दिवसाला ‘मर्दानी दिवाळी’ म्हणूनही ओळखले जाते. बुधवारी हा दिपावली पाडवा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
गुरुवारी भाऊ-बहीणीच्या अतूट नात्याचा सण
दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज, जो यंदा गुरुवारी (दि. २३) साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. भावंडांमधील प्रेम आणि आपुलकी वाढवणारा हा सण आहे. त्यासाठी भाऊ-बहीणींनी जोरदार तयारी केली आहे.





