Deepak Paigude : फुलगाव तालुका हवेली येथील सैनिकी शाळेच्या मैदानातून जाणारे रस्त्याचे काम थांबवण्याबाबत कळवून देखील काम सुरू केल्याच्या निषेधार्थ माजी आमदार दीपक पायगुडे यांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनाची हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. ग्रामविकास अधिकारी फुलगाव तालुका हवेली यांना सैनिकी शाळेच्या मैदानालगत जाणाऱ्या रस्त्याचे नूतनीकरण त्वरित बंद करण्याबाबत लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव संस्थेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता. सैनिकी शाळेच्या हद्दीतून रस्ता जात असल्याने तातडीने रस्त्याचे काम बंद करावे अशी विनंती प्राचार्य नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कूल फुलगाव यांच्या वतीने करण्यात आली होती. याशिवाय काम थांबवण्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांना देखील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी देखील पत्रव्यवहार केला होता. तरी देखील काम सुरू झाल्याने माजी आमदार दीपक पायगुडे यांनी प्रशासनाच्या विरोधात त्या रस्त्यावर बसून आंदोलन करण्यास सुरुवात केली असून या आंदोलनास अनेक मान्यवर पाठिंबा देत आहे. माजी आमदार पायगुडे यांनी मध्यरात्री पासून आंदोलन सुरू केल्याने सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. सैनिकी शाळेच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याबाबत काम बंद ठेवण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला केल्या होत्या. तरी देखील जाणीवपूर्वक काम चालू ठेवल्याने आंदोलन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या त्रास देण्याच्या भूमिकेचा मी निषेध करत आहे. -दीपक पायगुडे , माजी आमदार