BJP IT Cell : भाजपचे नवीन सोशल मीडिया प्रमुख दीपक म्हस्के कोण आहेत? जाणून घ्या…
BJP IT Cell : भाजपने अमित मालवीय यांच्याऐवजी दीपक म्हस्के यांची राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजकपदी नियुक्ती केली. जाणून घ्या त्यांचे शिक्षण, राजकीय आणि संघटनात्मक अनुभव.

BJP IT Cell : भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत छत्तीसगडमधील नेते दीपक म्हस्के यांची राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजकपदी नियुक्ती केली आहे. पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या नव्या टीममध्ये म्हस्के यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यांनी अमित मालवीय यांची जागा घेतली आहे. २०२७ मध्ये उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असल्याने भाजपच्या डिजिटल यंत्रणेतील हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
अमित मालवीय यांची जागा घेतली –
भाजपच्या संघटनात्मक फेरबदलात अमित मालवीय यांना आयटी सेलच्या प्रमुखपदावरून बाजूला करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत मालवीय यांनी भाजपची डिजिटल आणि सोशल मीडिया यंत्रणा विस्तारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. निवडणूक प्रचार आणि पक्षाच्या राजकीय संवादामध्ये आयटी व सोशल मीडिया विभागाचे महत्त्व वाढत असताना त्यांची भूमिका प्रभावी ठरली होती.
कोण आहेत दीपक म्हस्के?
दीपक म्हस्के हे रायपूरमधील भाजपचे वरिष्ठ नेते असून ते छत्तीसगड भाजपचे स्थायी निमंत्रित सदस्य आहेत. निवडणूकविषयक डेटा, तंत्रज्ञान, माहिती संकलन, विश्लेषण तसेच तळागाळातील जनसंपर्काचा त्यांना अनुभव आहे.
म्हस्के यांनी एमएस्सी (रसायनशास्त्र)चे शिक्षण घेतले असून त्यांच्याकडे सिमेंट टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा आणि संगणक प्रोग्रामिंगचे प्रमाणपत्र आहे. राजकीय-संघटनात्मक कामात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.
Congratulations to all the newly appointed office bearers of the BJP. Their appointments come at a crucial juncture as the party prepares to scale newer heights and take its message and organisation to every corner of the country.
I wish to particularly congratulate Shri Deepak…
— Amit Malviya (@amitmalviya) August 17, 2026
शेतीपासून भाजपच्या डिजिटल यंत्रणेपर्यंत –
म्हस्के यांचा अनुभव केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. त्यांनी ३५ वर्षांहून अधिक काळ फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्राशी संबंधित काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न आणि तळागाळातील नागरिकांशी त्यांचा संपर्क राहिला आहे.
भाजपमध्ये त्यांनी छत्तीसगडच्या राज्य आयटी सेलचे प्रभारी म्हणून काम केले आहे. तसेच पक्षाचे राज्य प्रवक्ते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. निवडणूकविषयक डेटा संकलन व विश्लेषण आणि सरकारी कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संबंधित माहितीच्या कामासाठीही ते ओळखले जातात. त्यामुळे राष्ट्रीय सोशल मीडिया यंत्रणेची जबाबदारी त्यांच्या अनुभवाशी जोडली जात आहे.
मंत्रीपदाचा दर्जा आणि इतर जबाबदाऱ्या –
२०२५ पासून म्हस्के हे छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेडचे (CGMSC) अध्यक्ष आहेत. या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. याशिवाय इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळावर त्यांनी स्वतंत्र संचालक म्हणूनही काम केले आहे.
तळागाळातील जनसंपर्काच्या दृष्टीने त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रम, आरोग्य शिबिरे, ग्रामीण ग्रंथालये आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणाऱ्या मोहिमांमध्येही सहभाग घेतला आहे.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने डिजिटल संघटनेची धुरा डेटा, तंत्रज्ञान आणि तळागाळातील अनुभव असलेल्या म्हस्के यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचाराच्या रणनीतीत त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.





