Deepak Kesarkar: “मराठवाड्याचा दुष्काळ हटू दे, सिंधुदुर्गचा विकास घडू दे!”; दीपक केसरकरांचे गणरायाला साकडे
Deepak Kesarkar: गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सावंतवाडीचे आमदार तसेच माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी सपत्नीक गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली.

Deepak Kesarkar: गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सावंतवाडीचे आमदार तसेच माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी सपत्नीक गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली. यावेळी महाराष्ट्रात शांतता नांदावी, राज्यातील जनता सुखी-समृद्ध राहावी आणि सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाच्या चरणी केली.
यावेळी केसरकर यांनी मराठवाड्यातील दुष्काळाचे संकट लवकर दूर व्हावे, यासाठीही गणपती बाप्पाकडे साकडे घातले. मराठवाड्यातील नागरिकांना दुष्काळाच्या संकटातून दिलासा मिळावा आणि त्यांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्गच्या विकासासाठीही त्यांनी गणरायाकडे विशेष प्रार्थना केली. जिल्ह्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, फलोत्पादक आणि मच्छीमारांच्या जीवनात समृद्धी यावी, तसेच सिंधुदुर्ग हा देशातील सर्वोत्तम पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला यावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जनसेवेसाठी मिळालेल्या पदाचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याची शक्ती गणरायाने द्यावी, अशी प्रार्थनाही केसरकर यांनी केली. चार वेळा निवडून दिलेल्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा करता यावी आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बळ मिळावे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने केसरकर यांच्या या प्रार्थनेतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा, तर सिंधुदुर्गच्या विकासाला नवी दिशा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.





