शिंदे गट – अजित पवार गटात अंतर्गत धुसफूस? प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

मुंबई – भाजप शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी नुकत्याच केलेल्या कोल्हापूर पुराबाबतच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी केसरकरांना टोला लगावला. यामुळे शिंदे पवार गटातील मंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे कि काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
सध्या राज्यभर ठीक ठिकाणी धो धो पाऊस सुरु आहे. यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. अशात साईकडे प्रार्थना केली म्हणून कोल्हापुरात पूर आला नाही असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतंच केलं. “त्या दिवशी मी शिर्डीमध्ये गेलेले होतो कोल्हापुरात राधानगरीतील पाणी सोडल्याने पाच फुटांनी पाणी वाढत याची सर्वांना माहिती आहे. मात्र यावेळी एक फुटाणे देखील लेवल वाढली नाही. त्या दिवशी मी स्वतः त्या ठिकाणी होतो. प्रार्थनेमध्ये देखील ताकत असते” असं केसरकर यावेळी म्हणाले.
केसरकारांच्या या वक्तव्यावरून सरकारमधील मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही आमच्याकडे येऊन देवाचा धावा करा आणि आमची धरण पाण्याने भरून द्या. आमची सर्व धरण पन्नास टक्के पेक्षा कमी भरलेली आहेत. असं स्पष्ट मत यावेळी मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केलं.
भुजबळ आणि केसरकर हे एकाच मंत्रिमंडळात काम करतात. मात्र शिंदे भाजप सरकारमधील मंत्र्यांनी पहिल्यांदाच एकमेकांच्या विषयावरून टोलेबाजी केल्याने पवार शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये काही धुसपूस सुरु आहे का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.




