जून 2022 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. राज्यात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आणि दोन गटांमध्ये पक्षाची विभागणी झाली. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे मविआचे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देखील एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेला मिळालं. दरम्यान त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. काय म्हणाले दीपक केसरकर? पक्षात मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. मात्र पुन्हा युतीची स्थापना करा असं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या मागणीला विरोध केला, तेव्हाच एकनाथ शिंदे यांनी पुढचं पाऊल उचललं, असं दीपक केसरकर म्हणाले. ज्यावेळेला पक्षात मतभेद झाले त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती स्विकारली नाही. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी होतं. ते खूप भावनाप्रधान आहेत. कोणी असं म्हणण्याचं कारण नाही, की एवढा मोठा मनुष्य एखाद्या पदासाठी एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली तेव्हा ते म्हणाले की, तुम्हीच मुख्यमंत्री राहा पण ज्या विचारधारेसाठी महाराष्ट्रातील जनतेनं आपल्याला निवडून दिलं आहे, त्या जनतेच्या मताचा आदर करा, तुम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये युतीची स्थपाना करा आणि याला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी नकार दिला, तेव्हा पुढचं पाऊल उचललं गेलं, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.