नवी दिल्ली – येथील न्यायालयाने मंगळवारी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्या पोलीस कोठडीची मुदत आणखी 7 दिवसांनी वाढवली. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी केलेल्या ट्रॅक्टर संचलनावेळी लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचारावरून सिद्धू याला अटक करण्यात आली. लाल किल्ल्यातील हिंसाचारात सिद्धू सामील असल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर तो अनेक दिवस फरार होता. त्यामुळे त्याची माहिती मिळवण्याच्या उद्देशातून पोलिसांनी 1 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अखेरीस 8 फेब्रुवारीच्या रात्री त्याला हरियाणात अटक करण्यात आली. पुढील दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. इतर आरोपी समजण्यासाठी सिद्धूची आणखी चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याच्या कोठडीची मुदत वाढवण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली. हिंसाचाराच्या ठिकाणी सिद्धू हजर असल्याचे दर्शवणारे व्हिडीओ उपलब्ध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.