‘आठवड्यातील एक दिवस जनतेसाठी निश्चित करा’: लोणावळ्यातील आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची अधिकाऱ्यांना सूचना

लोणावळा: शहरातील विविध विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा नगर परिषदेत आढावा बैठक घेतली. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सुरक्षाविषयक गरजांशी संबंधित असलेल्या प्रकल्पांची गती वाढवून नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा दौऱ्यामागचा उद्देश असल्याचे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.
विकासकामांची पाहणी आटोपल्यानंतर नगरपरिषद कार्यालयात सर्व संबंधित अधिकारी, अभियंते आणि प्रशासकीय प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक प्रकल्पावरील कामाची सद्यस्थिती, येणाऱ्या अडचणी, निधीची स्थिती आणि पूर्णत्वासाठी लागणारा कालावधी याबाबत चर्चा करण्यात आली.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे, लोणावळा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारती देखील ८० टक्के काम पूर्ण झाले, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण ही कामे ७० टक्के पूर्ण झाली आहेत, उर्वरित कामांना गती देण्यासाठी वाढीव निधी देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.
जिल्हाधिकारी शहरात येणार
लोणावळा शहरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला नांगरगाव-भांगरवाडी या उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून जिल्हाधिकारी स्वतः या कामाची पाहणी करण्यासाठी व शहरातील इतर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ५ जुलै रोजी लोणावळा शहरामध्ये येणार असल्याची माहिती आमदार शेळके यांनी बैठकीत दिली.
या विकास कामांची केली पाहणी
ग्रामीण पोलीस स्टेशन तुंगार्ली, पांगळोली शासकीय इमारत, खंडाळा गावातील शाळेची जागा, लोणावळा शहर पोलीस स्टेशनची नवीन इमारत, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कन्याशाळा भांगरवाडी, उपजिल्हा रुग्णालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक
नागरिकांच्या तक्रारी अन् आमदारांची सूचना
आढावा बैठकीदरम्यान नागरिकांनी, नगरपरिषदेमध्ये वारंवार चकरा मारून देखील समस्या सुटत नसल्याची तक्रार केली. तसेच मुख्याधिकारी नागरिकांना भेटत नाही, नागरिकांशी योग्य प्रकारे संवाद साधत नाही, अशाही तक्रारी समोर आल्या. त्यावर, लोणावळा मुख्याधिकारी यांनी नागरिकांना वेळ देण्यासाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित करावा. त्या दिवशी कार्यालयामध्ये उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न सोडवावेत, त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात, अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांना केली.





