नवी मुंबई – वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील 6 विद्यार्थ्यांनी वर्गात आणि शाळेच्या परिसरात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. शाळेच्या नियम आणि शिस्तीविरोधात वागल्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना घरी पाठवले. त्यांना शाळेतून काढलेले नाही. हे 6 विद्यार्थी दहावीतील आहेत. त्यामुळे त्यांना शाळेतून काढू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(मनसे) विद्यार्थी संघटनेने शाळेबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. मनसे विद्यार्थी सेनेने शाळा प्रशासनाला जाब विचारला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत परत घेतले नाही तर तोडफोड करण्याचा इशारा मनसेने दिला होता. मनसेच्या आंदोलकांची आक्रमकता पाहून शाळा प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत दिलगिरी व्यक्त केली. तसेच ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढले होते. त्या विद्यार्थ्यांना शाळेत परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.