लोकसभा सभापती पदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय एकतर्फी : अभिषेक बॅनर्जी

कोलकाता : लोकसभा सभापती पदासाठी विरोधी इंडिया आघाडीने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांच्या विरोधात कॉंग्रेसचे के. सुरेश यांनी उमेदवारी अर्जही दाखल करून टाकला. मात्र या निवडणुकीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांमधील विसंवादाचे सूर कानावर पडत आहेत. तृणमूल याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे.
सभापती पदासाठी कॉंग्रेसचे के.सुरेश यांना रिंगणात उतरवण्याबाबत आमच्या पक्षाशी कोणतीही चर्चा केली गेली नसल्याचे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख ममता बॅनर्जी घेतील असेही ते म्हणाले. अभिषेक म्हणाले की आमच्याशी कोणताही संपर्क साधला गेला नाही आणि कोणती चर्चाही झाली नाही. दुर्दैवाने हा एकतर्फी निर्णय आहे.
दरम्यान, सुरेश यांनी जो अर्ज दाखल केला आहे त्यावर तृणमूल कॉंग्रेसकडून स्वाक्षरी करण्यात आली नसल्यामुळे आज रात्री होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीलाही तृणमूलचे नेते उपस्थित राहणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट झाले. दरम्यान, ओम बिर्ला यांना पाठिंबा देण्याबाबत विरोधी पक्षांकडून काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. त्या सरकार पक्षाकडून अमान्य करण्यात आल्या. अध्यक्ष हे संपूर्ण सभागृहाचे असतात व ते कोणत्या पक्षाचे नसतात. त्यामुळे पाठिंबा हा सशर्त असू शकत नाही असे सरकार पक्षाकडून सांगण्यात आले.




