Satara | सुरवडीत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची निर्णय

कोळकी, (प्रतिनिधी) – सुरवडी, ता. फलटण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सखी सावित्री समिती आणि विशाखा समितीची संयुक्त सभा पार पडली.
या सभेमध्ये शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. लवकरच विद्यालयामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
विद्यालयातील विद्यार्थ्यांना चिराग ॲप आणि चाइल्ड हेल्पलाइन नंबर 1098 बद्दल माहिती देण्यात आली. तक्रार पेटी कार्यान्वित करण्याचे ठरले. अध्यक्षस्थानी सौ. पल्लवी वाघ होत्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक घाडगे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
यावेळी निंभोरे केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख सोमनाथ लोखंडे यांचा सत्कार घेण्यात आला. समुपदेशक म्हणून लोखंडे आणि श्रीरंग पवार हे उपस्थित होते.
याप्रसंगी आरोग्य अधिकारी सौ. अश्विनी गुजर, बाळासाहेब जगताप, पोलीस पाटील संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले.
सभेस ग्रामपंचायत सदस्या सौ. लीना जाधव, अंगणवाडी सेविका सौ. दैवता भोईटे, आशा सेविका सौ.नीलम जगताप, आशा सेविका सौ. मनीषा कोकरे व सौ उषा शिंदे उपस्थित होते. सौ. दिपश्री कुदळे यांनी प्रास्ताविक केले. विजय साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.





