महापालिकेची माहिती; बाधितांची संख्या कमी होऊ लागली
पुणे – शहरातील करोना बाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने महापालिकेने दोन करोना चाचणी केंद्रे (स्वॅब सेंटर) तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ढोले पाटील रस्त्यावरील महात्मा फुले शाळेतील स्वॅब सेंटर आणि कै. सुंदराबाई राऊत दवाखाना, केळेवाडी येथील स्वॅब सेंटर बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
शहरात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेने विविध भागात टप्प्याटप्प्याने 20 स्वॅब सेंटर उभारले. या ठिकाणी करोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांच्या नाकातील आणि घशातील द्रवाचे नमुने (स्वॅब) घेऊन, ते चाचणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले जात होते. रॅपिड अँटिजेन किट उपलब्ध झाल्यानंतर या सेंटरमध्ये तातडीने करोना चाचणीही केली जाऊ लागली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करोना साथरोगाने उच्चांक गाठला असताना, या स्वॅब सेंटरवर चाचणी करून घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत होती.
मात्र, गेल्या काही दिवसांत नवे बाधित आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर करोनाच्या सक्रिय रुग्णांची, त्यातही गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे स्वॅब सेंटरवर चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे काही स्वॅब सेंटर तात्पुरते बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शहरात करोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे काही स्वॅब सेंटरवर चाचणीसाठी येणाऱ्यांची संख्या नगण्य झाली आहे. त्यामुळे ढोले पाटील रस्त्यावरील आणि केळेवाडीतील स्वॅब सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले आहे. उर्वरित 18 स्वॅब सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, परंतु, तेथेही चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या घटत आहे.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका