युवा नेते पांडाभाऊ साने यांनी स्वीकारला दातृत्वाचा रोलमॉडेल
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात “करोना’ या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले आहे. शासनाने 21 दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. सर्व नागरिक या आदेशाचे पालन करणे हे आपले कर्तव्य समजून घरातच राहत आहेत. विशेषतः यात सहभागी नागरिकांचे हातावर पोट आहे. तरीही ते या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
मात्र, हातावर पोट असणारे, मजुरी करुन दररोज आपली उपजीविका भागवणारे कष्टकरी, औद्योगिक कामगार, छोटे दुकानदार हे घरीच असल्याने कुटुंबाची उपजिविका भागविण्यासाठी हतबल झाले आहेत. कामगारांचे कामही बंद झाले आहे. त्यामुळे हातात पैसेच नाहीत, मग घरभाडे, दुकानाचे भाडे तरी घर, दुकानमालकाला कसे द्यावे, अशी परिस्थिती या व्यावसायिकांची व कामगार भाडेकरूंची झाली आहे. अशातच प्रभाग क्रमांक 1, चिखली-मोरेवस्तीतील युवा नेते पांडाभाऊ साने हे या गोरगरीब नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी आपल्या मालकीच्या सदनिका, दुकान गाळे, व भाडेकरुंकडून मार्च महिन्याचे भाडे न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे समस्त चिखलीकरांकडून कौतुक होत आहे.
पांडाभाऊ साने म्हणाले की, करोनाच्या आपत्तीमुळे जगभरात संकट ओढावले आहे. राज्यावर ओढवलेली आपत्कालीन परिस्थिती निवारण्यासाठी अनेक मातब्बर, दानशूर व्यक्ती व संस्था पुढे येत, जमेल तशी मदत करीत आहेत. परिणामी, देशात “लॉकडाऊन’ झाल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक सर्वांनाच नोकरी, व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला साद देत, सदनिका, दुकानदार व भाडेकरुंकडून मार्च महिन्याचे भाडे न आकारण्याचा निर्णय साने यांनी घेतला आहे.