डॉ. राजू गुरव पुणे, दि. 20 -राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अपडेशनचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. तब्बल 34 लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली नसल्याची बाब उघड झाली आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका झाल्याची बाबही निदर्शनास आलेली आहे. आधार नोंदणी व अपडेशचे काम येत्या 31 डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. नव्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीनुसारच योजनांचा निधी वितरित होणार आहे. राज्य शासनाकडून शाळा अनुदानासह पोषण आहार, गणवेश, पाठ्यपुस्तके वाटप, शिष्यवृत्ती या विविध योजनांसाठी विद्यार्थी संख्येचा विचार करुन निधीचे वाटप होते. कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अपडेशनही मोहीम हाती घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये नोंदविण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीत नाव, जन्मतारीख, पत्ता यांसह इतर माहितीत चुका झाल्या आहेत. त्यामुळे आधारची माहिती सरलशी जुळत नसल्याची बाब समोर आलेली आहे. यामुळे आधार अपडेशन व्यवस्थित करुन घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षण आयुक्तालय, शिक्षण संचालक कार्यालयामार्फत अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बैठका घेऊन आढावा घेण्याचा धडाकाही लावण्यात आला आहे. मशीन धूळखात… विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अपडेशनचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षात शाळा बंदच होत्या. यासह इतर काही कारणास्तव संबंधित कंपनीबरोबरचा करार रद्द करण्यात आला होता. विद्यार्थ्यांची मोफत आधार नोंदणी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून लाखो रुपयांचा खर्च करुन आधार नोंदणीच्या मशीनची खरेदी करुन त्याचे प्रत्येक तालुक्यांना वाटप करण्यात आले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ऑपरेटर्स नसल्यामुळे मशीन धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शासनमान्य अन्य ठिकाणच्या आधार नोंदणी केंद्रात नोंदणी करावी लागत असून, त्यासाठी पैसेही मोजावे लागत आहेत. ===================