महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू – राहुल गांधी

गरीबीवर सर्जिकल स्ट्राईक करणे हेच लक्ष्य
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. पण तीन राज्यांत आम्ही सत्ता आल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. महाराष्ट्रातही सत्ता आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे आश्वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. तसेच गरीबीवर सर्जिकल स्ट्राईक करणे हेच आमचे लक्ष्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संघाच्या बालेकिल्ल्यात अर्थात नागपुर येथील जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. राहुल गांधी म्हणाले,
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलतात, त्यांच वय जरा वाढलंय त्यामुळे त्यांना त्याची आवश्‍यकता वाटते. माझं तसं नाही, मला तुमच्यासोबत 15 ते 20 वर्षे काम करायचे आहे. आम्हाला खोटं बोलून प्रगती करतो असे दाखवायचे नाही. महिना 12 हजार रुपये प्रति महिना उत्पन्नापेक्षा एकही व्यक्ती देशात नको हे आम्ही ठरवले आहे. देशात कोणत्याही वर्गाचे उत्पन्न महिन्याला 12 हजारांपेक्षा कमी नको. भारताच्या 20 टक्के सर्वात गरीब वर्गाच्या बॅंक खात्यात कॉंग्रेसकडून पैसे जमा होतील याचे आश्वासन मी तुम्हाला दिले आहे. 15 लाख जमा करण्याचे खोटं आश्वासन मी देणार नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भाजपाचे नेते म्हणतात हे पैसे कुठून येणार? तुम्ही अनिल अंबानी यांना जमीन दिली तेव्हा हा प्रश्न का विचारला नाही? अनिल अंबानींना राफेलमध्ये सहभागी करून घेतले तेव्हा हा प्रश्न का आला नाही? पतंजलीला जागा दिल्या तेव्हा प्रश्न का विचारला गेला नाही? असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला.

नोटाबंदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांच्या खिशातला पैसा काढून व्यापाऱ्यांना वाटला. देशात ज्यांनी चोरी केली त्यांच्या खिशातून पैसे येतील. मेहुल चोक्‍सी, विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्या खिशातून पैसे काढून तुम्हाला देऊ. हे सरकार कर्जमाफीचा डंका वाजवते. मात्र ते शक्‍य झालं ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावामुळे. मात्र कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यात आले का? नाही आले. यावरूनच लक्षात घ्या हे सरकार खोटं बोलणारं सरकार आहे. शेतकरी, गरीबांसाठी मी जे आश्वासन दिले आहे ते पाळणारच असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.