कर्जबुडव्यांकडून वसुलीची मोहीम जोरात सुरू ; माल्या, मोदी आणि चोक्सी यांना घरघर

नवी दिल्ली – देशातील बँकांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावून फरार कर्जबुडव्यांकडून वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे. विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याकडून बँकांनी आतापर्यंत 18 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची माहिती सादर केली आहे.
केंद्राच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात पीएमएलए अंतर्गत दाखल प्रकरणांची माहिती देण्यात आली. सध्या देशात ईडीद्वारे मनी लाँड्रिंग अंतर्गत 4700 प्रकरणांचा तपास सुरू आहे. सर्व दाखल प्रकरणातील घोटाळ्याचा आकडा 67000 कोटी रुपयांच्या पलीकडे गेला आहे. मनी लाँड्रिग प्रकरणांच्या सुनावणीच्या संथ गतीचा फटका पैशांची रिकव्हरी करण्यासाठी होत असल्याचे सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, मनी लाँड्रिग कायद्यात फेरबदल करण्यासाठी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाची दारं ठोठावली आहे. केंद्राच्या वतीने देखील याप्रकरणी म्हणणं सादर करण्यात आलं आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्जबुडव्यांविरोधात पीएमएलएच्या अंतर्गत कारवाई केली जात असल्याची माहिती मेहता यांनी दिली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माल्या, मोदी आणि चोक्सीच्या संपत्तीच्या विक्रीद्वारे 13109 कोटी रुपये मिळविल्याची माहिती दिली होती. बँकांनी अलीकडच्या रिकव्हरीत 792 कोटी रुपये वसूल केले आहेत.

