प्रभात वृत्तसेवा पुणे – एका प्लॅटफाॅर्मवरून दुसऱ्या प्लॅटफाॅर्मवर जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडून शाॅर्टकट मारतात. मात्र, हाच शाॅर्टकट जीवावर बेततो, मागील दहा महिन्यांत २९७ प्रवाशांना असा शाॅर्टमुळे जीव गमवावा लागला आहे. तर मागील पाच वर्षांत तब्बल जवळपास दीड हजार प्रवाशांना जीव गमवावा लागल्याची घटना दरवर्षी घडत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर आरपीएफकडून सुरक्षा वाढविण्याची आवश्यकता आहे. पुणे रेल्वे विभागातून दररोज दोनशेहून अधिक रेल्वे गाड्या धावतात. त्यामध्ये दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक असून, प्रवासी संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुणे स्टेशनसह दौंड, मिरज या प्रमुख स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. यावेळी काही प्रवाशांकडून गाडी पकडण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब केला जातो. तर काही प्रवासी वेळेची बचत व्हावी किंवा पादचारी पूल ओलांडण्याचा कंटाळा करीत काही प्रवाशी थेट रूळ ओलांडून जातात. प्रवाशांकडून नियमांकडे दुर्लक्ष करून रेल्वे रूळ ओलांडतात.काही प्रवाशी कानात हेडफोन टाकून किंवा फोनवर बोलत धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे दिसून येते. यावेळी गाडी आली की जिवावर बेतते. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, पादचारी मार्गाचा वापर करावा यासाठी वेळोवेळी आवाहन करतात, कारवाईही केली जाते. मात्र, तरीही प्रवासी एकत नसून, अपघाताच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाही. मागील पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली तर दरवर्षी अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. २०२५ मध्ये आक्टोबरपर्यंत २९७ जणांचा अशा घटनेत मृत्यू झाला असून, २०२४ मध्ये ३८५, २०२३ मध्ये २९७, २०२२ मध्ये ३१८ तर २०२१ मध्ये २३९ जणांचा मृत्यु झाला आहे. या आकडेवरीवरून मागील पाच वर्षात या घटनांमध्ये वाढ होत असून, मृत्यु संख्याही वाढत असल्याचे दिसून येते. “प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, रूळ ओलांडणे धोकादायक आहे, पादचारी मार्गाचा वापर करावा, यासाठी कायम जनजागृती मोहीम राबविण्यात येते. रेल्वेने काही ठिकाणी तारेचे कुंपण घातले आहे. तसेच रेल्वे रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा आहे. अशा व्यक्तीवर वारंवार कारवाई करण्यात येते. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून शॉर्टकट मार्गाचा अवलंब करू नये.” -प्रियांका शर्मा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, पुणे विभाग