Uttar Pradesh – उत्तरप्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना वादळ आणि पावसाचा तडाखा बसला. त्या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १११ इतकी झाली. तर, ७२ जण जखमी झाल्याचे समजते. उत्तरप्रदेशात बुधवारी वादळ आणि पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे घरे, झाडे आणि वीजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या. त्याचा फटका २६ जिल्ह्यांना बसला. राज्यभरात २२७ घरांचे नुकसान झाले. त्याशिवाय, १७० जनावरे दगावली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने जीवित आणि वित्तहानीची दखल घेतली. त्यांनी बाधित कुटूंबांना २४ तासांत योग्य ती मदत पुरवण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला. राज्याचे मदत आयुक्त कार्यालय स्थितीवर देखरेख ठेऊन आहे. ते कार्यालय जिल्हा प्रशासनांशी समन्वय ठेऊन मदत उपलब्ध करत आहे. त्यामध्ये आर्थिक निधीचाही समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेल्या दुर्घटनांचा पूर्ण संवेदनशीलतेने आढावा घ्यावा. बाधित कुटूंबांना तातडीने आर्थिक मदत मिळवण्याची व्यवस्था करावी, असे आदेश योगींनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.