Hong Kong fire – हॉंगकॉंगमधील ७ उंच इमारतींना लागलेल्या भीषण आगीमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या आता वाढून १४६ झाली आहे. तर या जळीतकांडाला पाच दिवस उलटून गेले असूनही बेपत्ता असलेल्या १५० जणांचा अजूनही कोणताही ठावठिकाणा समजू शकलेला नाही. ज्वालाग्रही आणि कमी गुणवत्तेचे साहित्य वापरल्याबद्दल हॉंगकॉंगच्या ॲन्टी करप्शन एजन्सीने इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाशी संबंधित एका महिलेसह एकूण ८ जणांना अटक केली आहे. अग्निकांडामध्ये अग्निशामक दलाच्या एका कर्मचाऱ्यासह १४६ जण मरण पावले आहेत, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तब्बल ४,६०० जणांचे वास्तव्य आणि १,९८४ अपार्टमेंट असलेल्या या बहुमजली ७ इमारतींना आग कशी लागली याचे नेमके उत्तर अजूनही मिळू शकलेले नाही. तसेच आगीच्यावेळी बेपत्ता असलेल्या १५० जणांचा अजूनही काहीही ठावठिकाणा समजू शकलेला नाही, असे हॉंगकॉंगमधील माध्यमांनी म्हटले आहे. इमारतीमधील फायर अलार्म वाजले नाहीत. त्यामुळे लोकांना कोणतीही पूर्वकल्पना मिळू शकली नाही, अशी तक्रार काही रहिवाशांनी केली आहे. आगीच्या या घटनेनंतर चीनमध्ये उंच रहिवासी आणि सार्वजनिक इमारतींमधील फायर सिस्टीमच्या तपासणीचे आदेश दिले गेले आहेत.