लॉस एंजेलिस – कॅलिफोर्नियात भडकलेल्या वणव्यात मरण पावणाऱ्यांची संख्या आता १६ वर पोचली आहे. पाच जणांचा मृत्यू पॅलिसेड्स येथील आगीमुळे झाला आहे आणि ११ जण ईटन आगीमुळे मरण पावले आहेत. काल ही संख्या ११ होती. मात्र स्वानपथकांनी काही मृतदेह शोधून काढल्यामुळे ही संख्या वाढली आहे.
जे. पॉल गेटी संग्रहालय आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिसकडे वारे आगीला नेऊ शकतात अशी भीती आहे. तर नवीन स्थलांतराच्या इशाऱ्यांमुळे अधिक घरमालकांना धोका निर्माण झाला आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत आग ६२ चौरस मैल परिसरात पसरली होती.
जंगलांमध्ये लागलेल्या ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात आले आहेत. ईटन, हर्स्ट, केनेथ आणि पॅलिसेड या भागातल्या सुमारे ३८ हजार एकरमध्ये ही आग पसरली आहे. या वणव्यामुळे आतापर्यंत १३ जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
१२ हजारांहून अधिक घरं आणि इमारती नष्ट झाल्या आहेत. ही आग पूर्वेकडे सरकत असल्याने ब्रेंटवुड आणि एन्सिनोला ही स्थलांतराचे आदेश दिले आहेत. या भागात बुधवारपर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने आग आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.