मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; २० कोटींची केली मागणी

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. एका अज्ञात व्यक्तीने २७ ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला होता.
“तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम शूटर आहेत”, असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने ई-मेलमध्ये म्हटले होते. धमकीचा ई-मेल आल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना काही दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अंबानी दाम्पत्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
Reliance Industries Chairman Mukesh Ambani received death threat on email on 27th October, threatening to shoot him if he failed to pay Rs 20 crores. Case registered under sections 387 and 506 (2) IPC in Gamdevi PS of Mumbai: Police
— ANI (@ANI) October 28, 2023
बिहारमधील दरबंगा शहरातून आरोपी राकेश कुमार मिश्राला अटक करण्यात आली होती. त्याने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून धमकी दिली होती.





