प्रभात वृत्तसेवा पिंपरी – मारुंजीतील शिंदेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २१) दुपारी कासारसाई धरणावरून घरी परतणाऱ्या तरुण-तरुणीच्या दुचाकीला भरधाव मिक्सरने दिलेल्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. याच आठवड्यात जांबे येथे झालेल्या अपघातात डंपरच्या चाकाखाली असल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.पुण्यातील नवले पुलावरील अपघातानंतर हिंजवडी परिसरातील अवजड वाहनांमुळे होणरे अपघात पिंपरी चिंचवड शहरात चर्चेचा विषय बनले आहेत. रिदा इमरान खान (वय १९, रा. विमाननगर, पुणे) हिचा मृत्यू झाला आहे. विवेक ठाकूर हा अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी मिक्सर चालक अजमल अख्तर अन्सारी (वय ३२, रा. जांबे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिदा आणि विवेक हे कासारसाई धरणावरून दुचाकीने परतत असताना शिंदेवस्ती भागात मिक्सरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की रिदाचा जागीच मृत्यू झाला. विवेकला गंभीर स्वरूपाच्या दुखापती असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंजवडी-वाकड परिसरात अपघातांचे ‘हॉटस्पॉट’ गेल्या ११ महिन्यांमध्ये तब्बल ३७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. आयटी पार्क परिसरातील वाढती वाहनांची गर्दी, अवजड वाहनांची बेफिकीर धावपळ, वेगमर्यादा न पाळणे आणि वेगमर्यादांचे सर्रास उल्लंघन यामुळे मृत्यूचा हा आकडा वाढतच आहे.वाहतूक शाखेने गेल्या ११ महिन्यांत ५९ हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे. यामधून साडेसहा कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे. परंतु वाढते अपघात पाहता ही कारवाई तोकडी दिसत असून तरीही नियमभंग आणि बेशिस्त वाहनचालकांवर अंकुश लागलेला नाही, असे चित्र दिसत आहे. सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अवजड वाहनांवरील निर्बंध, वेगमर्यादा अंमलबजावणी, वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्यांची सुधारणा यांसाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. तसेच रात्रीच्यावेळी अवजड वाहतुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.