बिबट्याच्या पाच पिल्लांचा होरपळून मृत्यू

घोणस दिसल्याने पेटवले शेत

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथे उसाच्या शेतात बिबट्याच्या पाच पिलांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 3) सकाळी उघडकीस आली. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. गुणगे-शेटे मळ्यातील शेतकरी गोपीनाथ सखाराम गुणगे यांच्या शेतात उसाची तोडणी करण्यासाठी भीमाशंकर साखर कारखान्याचे मजूर बुधवारी (दि. 3) सकाळी आले होते.

ऊसतोड कामगारांना ऊस तोडणी करत असताना घोणस दिसून आली. त्यामुळे ऊसमालक गोपीनाथ गुणगे यांना बोलावून ऊस पेटविण्यात आला, त्यानंतर तेथे घोणस मृतावस्थेत दिसून आली. यावेळी उसाच्या आगीमुळे तेथे दडून बसलेला बिबट्या शेतातून बाहेर डोंगराच्या दिशेने पळून गेला. यावेळी ऊसतोड मजूरही भयभीत होऊन शेताबाहेर आले. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर ऊसतोडणी चालू केली असता मजुरांना बिबट्याची पाच पिले आणि घोणस साप मृतावस्थेत आढळून आली. यामध्ये दोन नर बिबटे, तीन मादी बिबटे आढळून आले.

उसाच्या आगीमुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे दिसून आले. ही घटना वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष अनिल हिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव हिंगे, तसेच जुन्नरचे सहायक उपवन संरक्षक जयरामे गौडा, मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्वल पालवे, महिला वनरक्षक एस. पी. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या पाच मृत पिल्लांचे शवविच्छेदन केले असता त्यांचा मृत्यू आगीने होरपळून झाल्याचे सांगितले. ही पिल्ले अंदाजे दहा ते पंधरा दिवसांची असावीत, असा अंदाज मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्वल पालवे यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.