पुणे जिल्हा | उन्हाच्या चटक्याने कोंबड्यांचा मृत्यू

वाल्हे, (वार्ताहा) – मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिक वाढली असून याचा फटका मानवाप्रमाणे पशु-पक्षी, प्राण्यांना, देखील बसत आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले असून उन्हामुळे कोंबड्यांचा मृत्यू होत आहे.
मागील वर्षी, 1 हजार कोंबड्यांमागे 6 ते 8 कोंबड्यांचा मृत्यू होत होता. यावर्षी यामध्ये वाढ होऊन दिवसाकाठी 10 ते 12 कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याचे व्यावसायिक सत्यवान सूर्यवंशी, विनय पवार यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील तापमान काही ठिकाणी जास्त प्रमाणात वाढले असून, याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. सोबतच याचा फटका सध्या पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे.
उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे वाल्हे व परिसरातील पोल्ट्री व्यवसायिकांची चिंता वाढली आहे. तापमान 31 अंशाच्या जवळपास गेल्याने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहेच, सोबतच अंडी उत्पादनातही घट झाली आहे. तसेच कोंबड्याचे वजन वाढत नाही.
उपाययोजनांवर भर
वाढत्या उष्णतेपासून, कोंबड्यांचे संरक्षण व्हावे म्हणून, वाल्हे परिसरातील व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मच्या छतावर गवत, उसाचे पाचट,तसेच नारळाच्या फांद्याही अंथरल्या आहेत. तसेच पोल्ट्री फार्ममध्ये जागोजागी फॉगर, स्पिंकर्लर, फॅन, कुलर आदी उपाययोजना केल्याने कोंबड्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.
पोल्ट्री व्यावसायिकांचे दुहेरी नुकसान
श्रावण महिना नुकताच संपला असून, पितृपक्ष सुरू आहे; यानंतर नवरात्र उत्सव सुरू होणार असून, पुढील किमान 25 दिवस तरी कोंबड्यांची मागणी घटते त्यामुळे कंपनीकडून पक्ष्यांची उचल वेळेत होत नाही.
त्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसतो आहे. त्यामुळे सध्या नैसर्गिक संकटा सोबतच कंपनीमुळेही पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.
कोंबडीची पिल्ले फार नाजूक असतात त्यांना उष्णतेची झळ सहन होत नाही. त्यामुळे दिवसभर पोल्ट्रीमध्ये फॅन लावणे, सतत शेडवर पाणी फवारणी करावी लागत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता कोंबड्यावर वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढला आहे.
या समस्या निर्माण होत असल्यामुळे परिणामी कोंबड्यांचे वजन कमी भरत आहे. यामधून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक वाढला असल्याने, पोल्टी व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. – सत्यवान सूर्यवंशी, पोल्ट्री व्यावसायिक, वाल्हे
आठवड्यातील काही दिवस, दिवसभर विजपुरवठा खंडित असतो यामुळे जनरेटर सुरू करावा लागत असल्याने डीझेलचा खर्च वाढत आहे. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटर सुरू करेपर्यंत उष्णता वाढत आहे. – विनय पवार, पोल्ट्री व्यावसायिक, आडाचीवाडी.

