मेढा -पोहताना दम लागल्याने नदी पात्रात बुडत असलेल्या मित्राला वाचविण्या गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचा गाळात रुतल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथील वेण्णा नदीपात्रात ही दुर्घटना घडली. संकेत भैरवनाथ दळवी असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अहे.
करोनामुळे पुण्या, मुंबईला असणारे नोकरदार आपल्या कुटुंबासह गावी आली आहेत. संकेत दळवी हा म्हाते खुर्द येथील असून तो शिक्षणासाठी कोपरखैराणे (मुंबई) येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होता.
करोनामुळे तोही गावी आला होता. शनिवारी तो आपल्या पाच मित्रांसह वेण्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. म्हाते खुर्द गावच्या हद्दीतील बेलाच्या डोहात सकाळी सात वाजता संकेत आपल्या मित्रांसमवेत पोहोचला. सर्वजण पोहत असताना एका मित्राला दम लागल्यो तो बुडू लागला. मित्राला बुडताना पाहताच पट्टीचा पोहणारा संकेत मित्राला वाचवण्यासाठी गेला. मित्राला ढकलत ढकलत तो बाहेर काढत होता.
मित्राला बाहेर काढत असतानाच संकेतचा पाय गाळात रुतला आणि तो नदीपात्रात बुडाला. ही बाब समजताच गावकऱ्यांना घटनास्थळी धाव घेऊन संकेतचा शोध सुरु केला.
तब्बल एक तासाच्या शोधानंतर संकेतचा मृतदेह गाळात रुतलेल्या अवस्थेत सापडला. मेढा येथील रुग्णालयात शवविच्छेदनानंतर संकेतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संकेतचे आई वडील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून संकेत हा आपल्या नातेवाईकांकडे कोपरखैराणे येथे शिक्षणासाठी राहत होता. वाशी येथे कॉमर्सच्या प्रथम वर्गात त्याचे शिक्षण सुरू होते. संकेत हा अभ्यास हुशार होताच, परंतु धावणे व पोहण्यामध्येही तो पटाईत होता. संकेतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांचा आक्रोश हा हृदय पिळवटूण टाकणारा होता.