चोर समजून मारहाणीत मृत्यू

लष्करातील माजी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
पुणे – चोर समजून मारहाण करण्यात आलेल्या स्किझोफ्रेनिया रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी एका निवृत्त कॅप्टनविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्यक्ती मारहाण करण्यासाठी “इनोव्हातून लोक आले आहेत’ असे सांगून निवृत्त कॅप्टनच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता.
निवृत्त कॅप्टनला तो चोर वाटल्याने त्याने खिडकीतून बांबूने संबंधीत रुग्णास मारहार करुन पिटाळून लावले होते. जखमी अवस्थेत हा व्यक्ती तेथून निघून गेल्यावर रस्त्यावर बेवारस अवस्थेत मृत पडला होता.
रामकिशन देविदास सुरवसे (26, रा. हलगी, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र घाटगे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात निवृत्त कॅप्टन बळीराम शिंदे (वय 68) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.
रामकीशन याला कोणीतरी आपल्याला मारहाण करायला येत आहे, असा भास होत होता. त्यामुळे त्याच्यावर लातूर येथील प्रेरणा रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, लॉकडॉऊननंतर दि. 18 ऑगस्ट 2020 रोजी तो काम शोधण्यासाठी पुण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांनी दि. 20 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तो वडगावशेरी येथील बॉम्बे सॅपर्स कॉलनीतील निवृत्त कॅप्टन शिंदे यांच्या बंगल्यातील व्हरांड्यात घुसला आणि त्याला कोणीतरी मारायला येत असल्याचा भास होत असल्याने तो “मला वाचवा, मला मारण्यासाठी कारमधून लोक आले आहेत’ असे बोलून किचनरूममध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला.
त्यास घरातील लोकांनी विरोध केला. दरम्यान, रामकीशन हा आक्रमक झाला आणि त्याने सोफ्यावर चढून शोसाठी लावलेला पितळी बिगुल किचनच्या काचेवर आपटून काच फोडून घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागला.
तो चोर असावा, असे समजून निवृत्त कॅप्टन शिंदे यांच्या घरातील व्यक्तींनी बांबू हातात घेतला आणि तो बंगल्यातून निघून जावा यासाठी फुटलेल्या खिडकीच्या काचेमधून बांबूने त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी बांबूचा मार लागून तो जखमी झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश पासलकर हे करीत आहेत.
अकस्मात मृत्यूच्या तपासात घटना उघडकीस
निवृत्त कॅप्टनने मारहाण केल्यावर सुरवसे जखमी अवस्थेत चालत मुंढवा येथे गेला. तेथे रस्त्यावर तो बेशुद्ध अवस्थेत पडला. मुंढवा पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषीत केले. याप्रकरणी मृंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
तपास करताना पोलिसांनी तो जेथे सापडला तेथून उलट्या दिशेने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली. तेव्हा तो चंदननगर येथील बॉंम्बे सॅपसे येथून चालत आल्याचे आढळले. यानंतर तेथे विचारपूस करत असताना शिंदे यांच्या बंगल्यात विचारणा केल्यावर त्याने असा एक व्यक्ती घरात घुसल्यावर आपण त्याला मारहाण करून हाकलून दिल्याची माहिती दिली. त्यानुसार हा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल केला.





