लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यातील हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट

पुणे – लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता येत्या सात ते आठ दिवसांत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यातील गरिबांना एका वर्षात 20 लाख घरे देण्याचे जाहीर केले आहे. राज्यात घरे मिळण्यासाठी 26 लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यातील 20 लाख नागरिकांना एका वर्षात 20 लाख घरे मिळणार आहे. सर्वेक्षणातील निकषसुद्धा कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे खरे बेघर असतील, अशा सर्व नागरिकांना या योजनेत सामावून घेतले जाणार आहे.
यंदा प्रजासत्ताक दिनी संचलनात महाराष्ट्राचा रथ नाही
प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याचा रथ यंदा समाविष्ट होणार नसल्यासंदर्भात विचारले असता, फडणवीस यांनी सांगितले, की संचलनात फक्त 15 रथ समाविष्ट असतात. आलटून पालटून राज्यांना संधी दिली जाते. यामध्ये महाराष्ट्र राज्याला डावलले नाही. आम्ही केंद्र सरकारला विनंती करू, की महाराष्ट्र राज्याचा रथ या संचलनात समाविष्ट करा.
पालकमंत्र्यांचा निर्णय तीन दिवसांत
मंत्रिमंडळात खाते वाटप झाल्यानंतर आता जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार, याकडे लक्ष लागले. महायुतीमध्ये तीन पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे तिनही पक्षांकडून पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, की पालकमंत्री नियुक्तीवरून रस्सीखेच नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत यावर निर्णय घेऊ.





