Satara: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद निवडीचा पेच कायम
Satara जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीत भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेना (शिंदे गट) चार संचालक निवडून आले आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सर्वांत मोठा पक्ष असला, तरी महायुतीतील अन्य दोन घटक पक्षांना सोबत घेतल्याशिवाय सत्तेचा मार्ग निर्विघ्न नाही. त्यामुळे नऊ विरुद्ध आठ आणि चार या आकड्यांपेक्षा राजकीय समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.

Satara: मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड आता केवळ पदाची निवड न राहता महायुतीतील राजकीय वर्चस्वाची कसोटी बनली आहे. अध्यक्षपदावर भाजपने दावा कायम ठेवला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आक्रमक पवित्रा घेत सत्तेतील वाट्याचा नवा हिशेब मांडला आहे. जिल्हा परिषदेची सत्ता भाजपकडे असल्याने जिल्हा बँकेचे नेतृत्व राष्ट्रवादीला मिळावे, अशी भूमिका पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदेसेनेशी जवळीक वाढविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीत भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेना (शिंदे गट) चार संचालक निवडून आले आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सर्वांत मोठा पक्ष असला, तरी महायुतीतील अन्य दोन घटक पक्षांना सोबत घेतल्याशिवाय सत्तेचा मार्ग निर्विघ्न नाही. त्यामुळे नऊ विरुद्ध आठ आणि चार या आकड्यांपेक्षा राजकीय समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आता केवळ अध्यक्षपदाची मागणी केलेली नाही, तर महायुतीतील सत्तावाटपाचा व्यापक प्रस्ताव पुढे केल्याचे समजते. जिल्हा परिषदेत भाजपला नेतृत्वाची संधी मिळाली असल्याने जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसला संधी द्यावी. भविष्यात जिल्हा परिषदेतील अडीच वर्षांच्या सत्तावाटपात राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेलाही योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या भूमिकेमुळे भाजपसमोर राजकीय समन्वयाचे आव्हान उभे राहिले आहे.
दुसरीकडे, भाजपमध्येही अध्यक्षपदाच्या संभाव्य दावेदारांवर एकमत नसल्याची चर्चा आहे. स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वाच्या प्रश्नामुळे निर्णय लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तोडगा निघाला नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री स्तरावर हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या (दि. १८) होणाऱ्या निवडीपूर्वी महायुतीच्या समन्वय बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत तडजोड होते की राष्ट्रवादी काँग्रेस- शिंदेसेना एकत्रित दबाव निर्माण करतात, यावर जिल्हा बँकेच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे.
भाजपपुढील आव्हाने- सर्वाधिक नऊ संचालक तरीही मित्रपक्षांची नाराजी
राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती- सत्तासमतोलासाठी बँके अध्यक्षपदावर हक्क
शिंदेसेनेची भूमिका- चार संचालकांच्या बळावर सत्तावाटपात निर्णायक भूमिका
फडणवीसांची कसोटी- मतभेद मिटवून महायुतीची एकजूट टिकविण्याचे आव्हान





