पुणे | टीईटी परीक्षा अर्जासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली आहे.
इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.
या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, इतर तपशील राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वरील वेबसाइटवर दिला असून, उमेदवारांनी विहित नमुन्यानुसार अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.



