वाई – पसरणी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दहा दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या 75 वर्षीय वृद्धाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. रविवारी रात्री उशिरा या वृद्धाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून वाई तालुक्याची चिंता आणखी वाढली आहे. पसरणी गावात भीतीचे वातावरण असून पूर्म गाव सील करण्यात आले आहे.
गावात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पसरणी गावाने वारंवार ठोस उपाययोजना केल्या. मात्र, मुंबईस्थित असणाऱ्या व्यक्तीमुळे पसरणी गावात करोनाचा शिरकाव झाला. ही करोनाबाधित व्यक्ती पत्नीसह मुंबईवरून गावास आली होती. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आलेल्या पसरणीच्या या व्यक्तीवर वाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी गावांतील आठ ते दहा जणांची उपस्थिती होती.
या व्यक्तीच्या घरातील मुलाचा गावांत वावर होता. या घटनेमुळे पसरणी गावात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले असून सध्या संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. संपूर्ण क्वारंटाइन सेंटरचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
रविवारी संध्याकाळी पसरणीसह वेरुळीला 48 वर्षीय महिला सापडल्याने तालुक्यात रुग्णांची संख्या पन्नाशीला आली आहे. तालुक्यात आजपर्यंत चार व्यक्तींचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुक्तीकडे वाई तालुक्याची वाटचाल होत असताना मुंबईस्थित असणाऱ्या लोकांमुळे वाई तालुका डेंजर झोनमध्ये गेला आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.