तळमावले : धामणी (ता. पाटण) येथील धामणी- मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये डोंगरातील पायवाटेचे निरीक्षण करताना एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत बिबट्या सुमारे दीड वर्षांची मादी असून तिचा न्यूमोनिया आजारामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील धामणी येथील धामणी- मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये वनरक्षक अमृत पन्हाळे, कर्मचारी वनमजूर नथुराम थोरात, वामन साळुंखे, अजय कुंभार, अजय सुतार व अनिकेत पाटील हे सर्व जण डोंगरातील पायवाटेचे निरीक्षण करत असताना त्यांना या पायवाटेलगत धामणी- मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये हा बिबट्या मृतावस्थेत आढळला. अमृत पन्हाळे यांनी ही माहिती तात्काळ वन विभाग, तसेच प्रशासनास दिली. त्यांनतर पशुवैद्यकीय विभागातील अधिकारी व्हानोळे यांनी घटनास्थळी येत मृत बिबट्याचा पंचनामा केला. त्यानंतर माजी वनरक्षक मुबारक मुल्ला व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.