प्रभात वृत्तसेवा इंदापूर( नीलकंठ मोहिते ) – इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाला राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विशेष लक्ष देऊन रुग्णांसाठी आवश्यक यंत्रणा, तपासण्या आणि उपचार यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह अनेक अधिकाऱ्यांची रुग्णांप्रती निष्काळजी आणि निर्दयी मानसिकता संपूर्ण सेवाच बिघडवत आहे.रुग्णालयात अत्याधुनिक सिटीस्कॅन केंद्र असताना देखील या आजारासाठी सिटीस्कॅन करू नका, अशी तंबी देत रुग्णांना परतवले जात असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पत्रकार सुरेश जकाते यांचे निधन झाल्यानंतर, त्यांचा मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जाणार होता. मात्र, कोल्ड स्टोरेज बंद असल्याने दीड तास मृतदेह पायऱ्यावर पडला होता.मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून त्यांनी सूचना केल्यानंतर, सेवाविभागाची धांदल उडाली. हा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहे. नागरिकांची भावना अशी की, रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी खाजगीत चांगली सेवा देतात. परंतु, सरकारी रुग्णालयात मात्र तुटपुंज्या सेवेमुळे रुग्ण त्रस्त आहेत. इंदापूरबाहेरील अधिकारी नेमले तरच सेवा सुधरेल, अशी मागणी सातत्याने होत आहे. उपजिल्हा रुग्णालयासाठी लाखो रुपयांचा निधी शासनाकडून येत असताना विभाग, रस्ते, उपकरणे धुळखात पडली आहेत. याबाबत स्वतंत्र चौकशी करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या सर्वाविषयी विचारले असता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली यांनी स्पष्ट उत्तर देण्याऐवजी उडवा-उडवीची भूमिका घेतल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. सोनोग्राफी… फक्त चार तास ! रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा आठवड्यात केवळ चार तास, तेही मंगळवारीच उपलब्ध असते. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक जणांना उसनेवारी पैसे करून तपासण्या कराव्या लागत असल्याने त्यांचा आर्थिक बोजा वाढत आहे. “शेव वाहिनी व बॉडी चेक-अप मशीन बंद” शासनाने दिलेली आधुनिक शेव वाहिनी कित्येक दिवसांपासून बंद आहे. संपूर्ण बॉडी चेक-अप मशीन वर्षानुवर्षे धुळखात पडलेलेना आहे, ऑपरेटर नसल्याचे कारण दाखवून रुग्णांची दिशाभूल केली जात आहे. प्रसूती रुग्णांची वाढती वाऱ्या-पिऱ्या करमाळा तालुक्याची जवळीक आणि परिसरातील साखर कारखान्यांमुळे प्रसूती रुग्ण महिलांची संख्या मोठी आहे. परंतु, बहुतेक रुग्णांना पुणे किंवा सोलापूर येथे हलवावे लागत असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील सेवांवरील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांचा ठाम मागणी आहे की, उपजिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे.