मायलेकाची व्यथा सोशल मीडियावर व्हायरल; एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात दगडाला बांधलेल्या मुलापर्यंत पोहोचला!

मुंबई: सातारा जिल्ह्यातील एका आईला आपल्या तीन वर्षांच्या मुलाला दगडाला बांधून मजुरी करावी लागत असल्याचा हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेला माध्यमांनी वाचा फोडली आणि ही बातमी राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली.
अवघ्या २४ तासांत शिंदे यांनी पुढाकार घेत त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. या मुलावर सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याचे आश्वासन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिले आहे. माध्यमांच्या या संवेदनशील बातमीपत्रणामुळे चव्हाण कुटुंबाला आधार मिळाला.
दगडाला बांधलेला मुलगा, आईची मजबुरी
सातारा जिल्ह्यातील पातेपूर गावात राहणारे अक्षय चव्हाण आणि त्यांची पत्नी मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा तीन वर्षांचा मुलगा जन्मापासूनच मुकबधिर आहे. कामादरम्यान मुलाला सांभाळणारे कोणी नसल्याने त्याला दोरीने दगडाला बांधून ठेवावे लागते, जेणेकरून तो कुठे जाऊ नये. ही मायेची काळजी आणि मजबुरी यांचे विदारक चित्र माध्यमांनी जगासमोर आणले. या बातमीची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी तातडीने मदतीची व्यवस्था केली.
View this post on Instagram
२४ तासांत ठाण्यात दाखल
माध्यमांनी ही बातमी सातत्याने प्रसारित केल्याने मायलेकाची व्यथा सर्वांपर्यंत पोहोचली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरित कारवाई करत चव्हाण कुटुंबाला साताऱ्याहून ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात आणले. मुलाचा सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि सहायक भरत गोपाळे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी समन्वय साधून उपचारांची सुरुवात केली आहे.





