शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांनी दिली माहिती; म्हणाले, ‘आम्ही सर्वांनी त्यांना…’

Ajit Pawar on Sharad Pawar Health: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी त्यांचे पुढील चार दिवसांचे दौरे रद्द केले आहेत. आता त्यांच्या प्रकृतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे.
शरद पवारांना कफचा त्रास जाणवत असल्याने बोलण्यास त्रास होत होता. आता डॉक्टरांनी त्यांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे अजित पवारांनी सांगितले. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.
शरद पवार यांनी प्रकृती खालावल्यामुळे त्यांचे नियोजित दौरे रद्द केले आहेत. खोकला झाल्याने त्यांना बोलण्यास अडचण येत होती. त्यानंतर त्यांनी पुढील 4 दिवसांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमातच त्यांच्या छातीत कफ झालेला जाणवत होते. यामुळे त्यांना बोलण्यास अडचण येत होती. त्याचवेळी आम्ही त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कार्यक्रम असल्याने ते कोल्हापूरला गेले.
कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांचा त्रास वाढला. तिथून ते मुंबईला गेले. डॉक्टरांनी आता त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून, त्याप्रमाणे ते विश्रांती घेत असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.





