राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक ! 60 वर्षीय व्यक्तीला उज्जेनमधून पोलिसांनी घेतले ताब्यत

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना दया सिंग उर्फ प्यारे सिंग याने धमकी दिली होती. यात्रेदरम्यानच तुम्हाला जीवे मारेन अशा प्रकारची धमकी यावेळी राहुल गांधी यांना देण्यात आली होती.
आता गुन्हे शाखेने आरोपी दया सिंगला अटक केली आहे. दया सिंग साठ वर्षांचे असून ते पंजाबी मोहल्ला, राजेंद्रनगर, बैतुल येथील रहिवासी आहेत. त्यांना उज्जैन येथून अटक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. वॉरंट बजावल्यापासून आरोपी फरार होता.
बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली
डीसीपी निमिष अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आरोपीने एका मिठाईच्या दुकानदाराला पत्र लिहून राहुल गांधींना मारण्याची आणि इंदूरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. त्यावेळी पोलिसांनी दया सिंगला पकडले होते मात्र त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.
नंतर जिल्हाधिकार्यांनी आरोपीविरुद्ध रासुका वॉरंट जारी केले, मात्र तो सापडत नव्हता. इंदूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना वॉरंटची अंमलबजावणी करण्यात अनेक अडथळे येत होते. त्यानंतर अखेर दयासिंगला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले.मिठाईच्या दुकानात सापडलेल्या पत्रात शीख दंगलीचा उल्लेख करण्यात आला होता. यासोबतच या व्यक्तीने काँग्रेस नेते कमलनाथ यांना देखील जीवे मारण्याची धमकीही दिली होती.





