केरळमधील सोने तस्करी प्रकरणात दाऊदचा हात?

नवी दिल्ली – केरळमध्ये राजकीय सनसनाटी निर्माण करणाऱ्या सोने तस्करी प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. या रॅकेटमध्ये दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सहभाग असल्याचा संशय राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयएने) व्यक्त केला आहे.
एनआयएने म्हंटले कि, सोन्याच्या तस्करीपासून मिळणाऱ्या नफ्याचा वापर ही देशविरोधी कृत्य आणि दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता गुप्त माहितीद्वारे मिळाली. यामुळे अधिक तपास करण्यासाठी आरोपींना १८० दिवस न्यालयीन कोठडीत ठेवणे आवश्यक आहे. एनआयएने सर्व आरोपींच्या जामीन अर्जाचा विरोध केला आहे. दरम्यान, सध्या हे प्रकरण दहशतवादी टोळ्यांच्या कारवाईच्या दृष्टीनेही पहिले जात आहे. याप्रकरणाचा सर्व बाजूने तपास सुरू आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी केरळमधील विमानतळावर कोट्यवधी रूपयांचे सोने जप्त करण्यात आले. तो साठा राजनैतिक स्वरूपाच्या सामग्रीत ठेवण्यात आला होता. ती राजनैतिक सामग्री केरळमधील संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दूतावासाच्या नावे पाठवण्यात आली होती.
संबंधित सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी असणारी स्वप्ना यूएई दूतावासाची माजी कर्मचारी आहे. त्यामुळे त्या प्रकरणाने केरळमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली होती. त्या प्रकरणामुळे सोने तस्करीत भारत आणि यूएईमधील काही प्रभावी व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय बळावला. त्यातून एनआयएकडे तपास सोपवण्यात आला.




