पुणे – सर्वाधिक गर्दी असलेल्या कमला नेहरू रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचा वीज पुरवठा शनिवारी सकाळी तब्बल तीन तास खंडित झाला. धक्कादायक म्हणजे यावेळी दोन ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी सुरू होत्या. तात्पुरत्या “बॅकअप’वर या सर्जरी करून पुढील सर्व सर्जरी रद्द करण्यात आल्या. तर डायलिसिसच्या रुग्णांना इतरत्र पाठवत प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना ताटकळत ठेवण्यात आले. तर, सुदैवाने नवजात अर्भक ठेवण्यात आलेल्या “एनआयसीयू’मध्ये वीजपुरवठा सुरळीत राहिला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास काही प्रमाणात वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, तोपर्यंत रुग्णांना ताटकळत रहावे लागला. तर शनिवार असल्याने रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असल्याने नेमके काय घडतेय, याचा चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. या रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासन कोट्यवधीचा निधी खर्च करत असताना; हा खर्च नेमका जातो कुठे? असा सवाल या प्रकारानंतर उपस्थित केला जात आहे. हे रुग्णालय महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असून, या ठिकाणी 16 “ओपीडी’ आहेत. काय घडला प्रकार? कमला नेहरू रुग्णालयाच्या जुन्या आणि नव्या इमारतीस महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. तर “जनरेटर बॅकअप’चीही सुविधा आहे. त्यामुळे महापालिकेने वीज पुरवठा जनरेटरच्या माध्यमातून घेतलेला आहे. परिणामी, वीज गेल्यास जनरेटर बॅकअप काही काळ चालतो. त्यानंतर, जनरेटर आपोआप सुरू होऊन वीजपुरवठा सुरू होतो. त्यात जुन्या व नव्या इमारतीसाठी स्वतंत्र फेज आहेत. जुन्या इमारतीचा फेज सकाळी सव्वादहाच्या सुमारस बंद पडला. त्यानंतर काय झाले हे कोणालाच समजले नाही. त्यामुळे काय झाले, हे शोधण्यात येथील कर्मचाऱ्यांनी जवळपास अर्धा-पाऊण तास वेळ घालवल्यानंतर अकरा वाजता वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठांकडून सव्वाअकरा वाजता विद्युत विभागास हा प्रकार कळविला. तर, जवळपास 12 वाजता विद्युत विभागाचे कर्मचारी दुरुस्तीसाठी दाखल झाले. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास पुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आला. नंतर पुन्हा दुरुस्तीचे काम करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असतानाच वीज ठप्प, हृदयरोग विभागाचा “आयसीयू’ही बंद कमला नेहरू रुग्णालयात प्रसूतीनिमित्त आलेल्या महिलांसाठीचे लेबर रुम, अस्थिरोग ऑपरेशन थिएटर तसेच हृदय शस्त्रक्रिया विभाग ऑपरेशन थिएटर, डायलिसिस सेंटर, जनरल सर्जरी ऑपरेशन थिएटर हे वीजपुरवठा खंडीत झालेल्या इमारतीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे वीजपुरवठा खंडीत झाला, त्यावेळी अस्थिरोग विभागाची एक शस्त्रक्रिया सुरू होती. त्यावेळी तातडीनं “बॅकअप’द्वारे हे ऑपरेशन पूर्ण केले. तर हृदयरोग विभागात एका रुग्णाचे ऑपरेशन संपले आणि वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र, वीज नसल्याने सर्व डायलिसिस बंद करण्यात आले. तर प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनाही बाहेरच थांबविण्यात आले. तर, रुग्णांना इतरत्र जाण्यास सांगण्यात आले. वीज नसल्याने हृदयरोग विभागातील ऍन्जिओप्लॅस्टी तसेच ऍन्जिओग्राफीची ऑपरेशन्सही रद्द करण्यात आली. तर ईसीजी तसेच इतर तपासणीसाठी आलेल्या लोकांना बसून रहावे लागले. धक्कादायक बाब म्हणजे हृदयरोग विभागाचा “आयसीयू’ही बंद ठेवावा लागला. एकच लिफ्ट; कर्मचाऱ्यांकडून जबाबदारीची चालढकल प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार तसेच सकाळची वेळ असल्याने रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. त्यातच हा प्रकार घडल्यानंतर अनेक कर्मचारी रुग्णांना माहिती देण्याऐवजी खोल्यांमध्ये जाऊन बसले. त्यामुळे रुग्णालयात आधीच अंधार, त्यानंतरही कर्मचारीही दिसत नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. तर, नागरिकांनी जे कर्मचारी दिसतील त्यांच्याकडे विचारणा केली असता “आज वीज येईल का, नाही भरवसा नाही.तुमच्या तपासण्या होणार नाहीत. दुसरीकडे जा नाहीतर सोमवारी परत या’ असे सांगत रुग्णांना परत पाठवत होते. त्यामुळे रुग्णालयात केवळ रुग्णच दिसत होते. तर वीज खंडित झाल्यानंतर या दवाखान्यात एकच लिफ्ट सुरू होती. त्यामुळे रुग्ण तसेच नातेवाईकांची तीन मजले चढून आणि उतरून दमछाक झाली. “रुग्णालयातील वीज पुरवठा ठप्प होणे, हे अतिशय गंभीर आहे. याबाबत आम्हाला माहितीही देण्यात आलेली नाही. याप्रकरणी आरोग्य प्रमुखांना प्रत्यक्ष रुग्णालयात भेट देत त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश दिला आहे,” असे विकास ढाकणे (अतिरिक्त आयुक्त, महापालिका) म्हणाले. “कमला नेहरू रुग्णालयात सकाळी सव्वादहाच्या सुमारास जनरेटरच्या केबल जळाल्या आहेत. विजेचा वाढता वापर, तसेच उन्हामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने कर्मचारी त्या ठिकाणी पाठविले होते. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झालेला आहे. तसेच आवश्यक ती कामे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत”, असे श्रीनिवास कंदूल (मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका) यांनी सांगितले.