प्रभात वृत्तसेवा दौंड – दौंड नगरपालिकेच्या आगामी निवडणुक या वेळी अधिकच रंगतदार होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात सरळ लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. म्हणजेच महायुतीतच रस्सीखेच होणार असून स्थानिक राजकारणात चुरस वाढली आहे.दौंड शहरात अनेक वर्ष सत्ता राखणारे प्रेमसुख कटारिया व विरधवल जगदाळे गटांनी पडद्यामागील हालचाली सुरू केल्या असून, पुढील काही दिवसांत या दोन्ही गटांचे राजकीय समीकरण अधिकच रोचक होणार आहे. सध्या कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढणार हे जरी निश्चित झाले नसले तरी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.मागील नगरपालिका निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडीकडे नगराध्यक्ष पदासह १० नगरसेवक निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १४ नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या २६ झाली असून दोन नगरसेवकांचा एक प्रभाग, असा बदल झाला आहे. नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. तर महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेऊन नगरपालिका निवडणुकीत सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दौंड नगरपालिकेची निवडणूक तिरंगी होणार की दुरंगी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कुल-थोरात यांची भूमिका निर्णायक? नगरपालिकेच्या निवडणुकीवर आगामी विधानसभेच्या निवडणुकांचा परिणाम होणार असल्याने येणारी नगरपालिका निवडणूक अधिक महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुल-थोरात यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची मानली जात आहे.