Daund News – दौंड विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे-पाटील (वय ९०) यांचे गुरुवारी (दि. १४) वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विधानसभेत त्यांनी दोन वेळा दौंड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. दौंड नगरपालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष असण्याचा बहुमान मिळविणाऱ्या उषादेवी जगदाळे यांनी सन १९७१ ते १९७२ या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. विधानसभेत त्यांनी सन १९७२ ते १९७७ आणि सन १९८५ ते १९९० या कालावधीत दौंड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे पती दिवंगत माजी आमदार कृष्णराव बाजीराव जगदाळे-पाटील यांनीही सन १९८० ते १९८५ या कालावधीत दौंड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. दौंड तालुक्यातील खानवटे येथील राजेभोसले राजघराण्याच्या उषादेवी या कन्या होत्या. त्यांचा विवाह दौंडचे कृष्णराव बाजीराव जगदाळे-पाटील यांच्याशी झाल्यानंतर त्या दौंडच्या सूनबाई झाल्या. मृदुभाषी असलेल्या उषादेवी जगदाळे यांना ‘मांसाहेब’ म्हणून संबोधले जात होते. त्यांच्या पश्चात २ मुलगे, ३ विवाहित मुली, सुना व नातवंडे, असा परिवार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र, तर दौंडचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे हे धाकटे पुत्र होत. त्यांची नात दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे या दौंड नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांना समाजमाध्यमांद्वारे श्रद्धांजली वाहिली. दौंड शहरातील स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.