नांदुर: दौंड तालुक्यातील नांदुर (ता. दौंड) परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढत असल्याने शेतात जाणारे शेतकरी, महिला आणि शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जनावरे दगावली आहेत. वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले असतानाच, आता बिबट्याच्या दहशतीमुळे नांदुर परिसरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. ऊसतोड कामगार, शेतात काम करणारे शेतकरी आणि महिलांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. काही ठिकाणी तर अगदी घरांजवळच बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील भीतीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या माहितीनुसार, बिबट्याने अनेक जनावरांना आपले भक्ष्य बनवले आहे. प्रशासन कधी जागे होणार? एखाद्या नागरिकाचा जीव जाण्यापूर्वीच वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी आर्त मागणी नांदुरचे ग्रामस्थ प्रशासनाकडे करत आहेत. ‘वन विभाग आणि स्थानिक प्रशासन बिबट्याला पकडण्यासाठी उपया नियोजन का करत नाही?’ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या संदर्भात दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिबट्याला तात्काळ पकडण्यासाठी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विशाल थोरात, नांदुर यांनी दिली आहे. तसेच, आमदार राहुल कुल यांनीही दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याशी संपर्क साधून याबाबत तात्काळ उपाययोजना करावी, असे सांगितले आहे, अशी माहिती माजी सरपंच नामदेव बोराटे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मयूर घुले, नांदूर यांनी दिली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार, वन विभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याला पकडावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.