Daund Crime: दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; एकावर गुन्हा
Daund Crime: महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई; आरोपीवर कठोर कारवाईसाठी पालिकेतील कर्मचारी आक्रमक.
Updated On:

Daund Crime – दौंड नगरपरिषद कार्यालयात महिला अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे नगरपरिषद परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दौंड नगरपालिकेत कार्यरत महिला अधिकारी आहेत. आरोपी गब्बर वाल्मीकी (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही), रा. दौंड)
याने (दि.22) जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास दौंड नगरपरिषद कार्यालयात येऊन महिला अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या केबीनबाहेर राहून अश्लील शिवीगाळ केली. आक्षेपार्ह हावभाव करून महिला अधिकाऱ्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. यावेळी आरोपीने धमकी देत महिला अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.दरम्यान, शासकीय कार्यालयात महिला अधिकाऱ्याशी झालेल्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.





