Dattatray Bharne : भोंदूबाबा अशोक खरात यांच्या महिलांच्या कथित शोषण प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात (Dattatray Bharne) मोठी खळबळ उडवली आहे. प्रकरण उघडकीला आल्यानंतर रोज नवनवीन कारनामे आणि फोटो समोर येत असल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणात राजकीय नेत्यांचे फोटो बाहेर येत असल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नेत्यांमध्ये (Dattatray Bharne) देखील हालचाली दिसून येत आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रकरण समोर आल्यानंतर प्रथम महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नंतर दबाव वाढल्याने शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला. दत्तात्रय भरणेंची सुरुवातीची भूमिका राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी प्रकरण समोर आल्यानंतर सुरुवातीला रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण केली होती. चार दिवसांपूर्वी त्यांनी सांगितले होते की, “या प्रकरणात चाकणकर यांची कुठलीही चूक नाही. त्या स्वतःहून गेलेल्या नाहीत. कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या असतील, महाराजांचे दर्शन झाले असेल किंवा भेट झाली असेल. यामध्ये रुपाली चाकणकर यांची कोणतीही चूक नाही.” Dattatray Bharne भरणेंचा युटर्न शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मात्र दत्तात्रय भरणे यांनी आपली भूमिका पूर्णपणे बदलली. ते म्हणाले, “मी यापूर्वी जेव्हा बोललो होतो, तेव्हा मला अशोक खरात यांच्याबाबत जास्त माहिती नव्हती. एकंदर हे प्रकरणही माहिती नव्हते. पण नंतर कळाले की, अशोक खरात हा भोंदूबाबा आहे. अशा मंडळींना वेगळ्याप्रकारे ठोकून काढले पाहिजे.” भरणे पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात चांगले महाराजही आहेत, पण १०० पैकी एखादवेळी अशी गोष्ट घडते आणि तेच तेच वाजवले जाते. काही लोक या भोंदूबाबाचा प्रचार करतात. मला त्याविषयी जास्त माहिती नव्हती म्हणून मी त्यावेळी तशी प्रतिक्रिया दिली. आम्ही कुठल्याही महाराज आणि बुवाबाजीच्या विरोधात आहोत. अजितदादांनी आम्हाला तशी शिकवण दिली आहे. आम्ही भोंदूबाबांना कधी जवळ केले नाही.” ते म्हणाले, “अशोक खरात कोण आहे हे मला माहिती नव्हते. या लोकांना ठोकून काढले पाहिजे, जेणेकरून इतर कोणताही महाराज असे कृत्य करणार नाही. हे महाराज लोकांना फसवतात, नादी लावतात. काही लोक त्यांचा प्रचार करतात. पण खरात भोंदूबाबा आहे. मला माहिती नव्हतं तो कसा आहे, मी सहज बोलून गेलो होतो.” अंधश्रद्धा कायद्यावर भाष्य दत्तात्रय भरणे यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत जे काही बाहेर येईल ते समजेल. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. खरात अत्यंत चुकीचा माणूस असून त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी खरात याची बाजू कधीच घेणार नाही. अशोक खरात यांच्यावर महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप आहेत. प्रकरणात पोलिसी तपास सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत. रुपाली चाकणकर यांनी दोन्ही पदांचे राजीनामे दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चर्चा सुरू आहे. दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांचा सूर बदलल्याने पक्षांतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे.