प्रभात वृत्तसेवा पळसदेव – राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफी मिळेल याची जोरदार चर्चा सुरू असून, सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांकडून कागदपत्रे मागवण्यास सुरुवात केल्यामुळे कर्जमाफीची आशा बळावली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच शेतकऱ्यांना योग्य ती कर्जमाफी मिळेल असे वक्तव्य केले होते, ज्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे. सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, सातबारा, पासबुक व फार्मर आयडी अशी आवश्यक कागदपत्रे जमा करून घेत आहेत. त्यामुळे या वेळी कर्जमाफी होणार अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, नेमकी किती कर्जमाफी होईल, याबद्दल सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. शेतकऱ्यांनी या वेळी इमानदार आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्यथा, सरकार केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, इमानदार शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. नेमकी किती माफी मिळेल आणि कोणत्या घटकाला लाभ मिळेल, हे कर्जमाफी जाहीर होईपर्यंत स्पष्ट होणार नाही. मात्र, या वेळी सरकारने मागच्या माफीसारख्या शर्ती न ठेवता, सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.