Dashavatar: ‘दशावतार’ चित्रपटावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया; सामाजिक विषयाचं कौतुक

Dashavatar: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चांगले दिवस आले आहेत. अलीकडे अनेक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्यातच १२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेला ‘दशावतार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, अवघ्या काही दिवसांतच कोटींची कमाई करत आहे.
या चित्रपटाबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी सिनेमाचं आणि त्यातील संदेशाचं कौतुक केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, “या सिनेमातून एका गंभीर प्रश्नाला हात घालण्यात आला आहे. आपल्या जमिनी वाचवा, कारण जमीनच तुमचं अस्तित्व आहे. हा फक्त कोकणातील प्रश्न नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची समस्या आहे. अनेक वर्षांपासून मी हे सांगत आलो आहे आणि हा चित्रपट त्याच मुद्द्यावर प्रकाश टाकतो.”
ते पुढे म्हणाले, “दिग्दर्शक सुबोध खानोलकरने हा गंभीर विषय अत्यंत हुशारीने ‘दशावतार’च्या माध्यमातून मांडला आहे. उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत आणि दिग्दर्शनामुळे हा सिनेमा प्रभावी ठरला आहे. महाराष्ट्राने यातील संदेश नक्कीच घ्यायला हवा.”
कलाकारांच्या कामगिरीबाबत बोलताना राज ठाकरे यांनी विशेष कौतुक केलं. “दिलीप प्रभावळकर यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. महेश मांजरेकर, प्रियदर्शिनी आणि इतर सर्व कलाकारांनीही उत्तम काम केलं आहे. या सिनेमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता, तो जे मुद्दे मांडतो त्यासाठी प्रत्येकाने हा सिनेमा नक्की पाहावा,” असं त्यांनी सांगितलं.





