Dashavatar Movie : 2025 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी अतिशय यशस्वी आणि संस्मरणीय ठरले आहे. यातील सर्वात चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘दशावतार‘ (Dashavatar). हा चित्रपट 12 सप्टेंबर 2025 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान पटकावले. कोकणातील पारंपरिक दशावतार लोककलेवर आधारित असलेला हा चित्रपट एक वेगळ्या धाटणीचा थ्रिलर आहे, ज्यात वृद्ध कलाकाराच्या आयुष्यातील संघर्ष, कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गाचे सुंदर चित्रण आणि अध्यात्मिक गोष्टींचा सुरेख संगम साधला गेला आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांसारख्या दिग्गज व नवोदित कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथानक एका ज्येष्ठ दशावतार कलाकार बाबुली मिस्त्री (दिलीप प्रभावळकर) यांच्या जीवनाभोवती फिरते. त्यांच्या अंतिम नाट्यप्रदर्शनाच्या रात्री घडणाऱ्या घटनांमधून विष्णूंच्या दहा अवतारांच्या संकल्पनेला आधुनिक सामाजिक संदर्भात मांडण्यात आले आहे. अध्यात्म, श्रद्धा आणि विज्ञान यांचा सुंदर मेळ घालत हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. कोकणाच्या निसर्गसौंदर्याचे आणि लोककलेचे दर्शन घडवताना चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली आणि 2025 च्या सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपटांपैकी एक ठरला. आता या चित्रपटाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, ‘दशावतार’ हा चित्रपट 98 व्या अकादमी अवॉर्ड्स (ऑस्कर 2026) च्या मुख्य स्पर्धेत निवडला गेला आहे. जगभरातील हजारो चित्रपटांमधून निवड होणाऱ्या यादीत स्थान मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. यामुळे चित्रपटाला अकादमी स्क्रीनिंग रूममध्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळाली आहे, जी मराठी सिनेमासाठी ऐतिहासिक घटना मानली जात आहे. ही बातमी शेअर करताना दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “कष्ट, प्रामाणिक मेहनत आणि मोठी स्वप्ने पाहण्याची खरी ताकद काय असते, हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. फक्त आपल्या कामावर विश्वास ठेवणे, नम्रतेने सातत्याने मेहनत करत राहणे, अपयश आले तरी थांब न करता पुन्हा उभे राहण्याची हिम्मत आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या माणसांची साथ हे सगळे मिळाले की खरे यश मिळते. आज ‘दशावतार’ला ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत निवड झाल्याचा मेल आला. गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीला जगभरात मान्यता मिळाल्याचे समाधान वेगळेच आहे. हा आनंद फक्त चित्रपट निवडला गेला म्हणून नाही, तर मराठी चित्रपट जागतिक स्तरावर समर्थपणे उभा राहू शकतो हे सिद्ध झाल्यामुळे अधिक खास वाटतो.” ‘दशावतार‘च्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला नवे बळ मिळाले आहे. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षकांच्या नजरा खेचून आणेल आणि मराठी संस्कृतीला जागतिक व्यासपीठावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा आहे. मराठी सिनेमाप्रेमींसाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे!