तीन आसनी रिक्षांमध्ये धोकादायक प्रवासी वाहतूक

भोसरी  – तीन आसनी रिक्षांमधून शहरात ठिकठिकाणी बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू आहे. वाहतूक पोलिसांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. रस्त्यात वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने सर्वच प्रमुख रस्त्यांवरून प्रवाशांची चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली वाहतूक तत्काळ थांबवावी व बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

शहराच्या विविध भागात रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत अवैध प्रवासी वाहतूक चालविली आहे. अत्यंत बेजबाबदार आणि धोकादायक पद्धतीने करण्यात येत असलेल्या या रिक्षांमध्ये सहा ते सातहून अधिक प्रवासी बसवून वाहतूक सुरू असते. केवळ तीन प्रवाशांचा परवाना असताना अशा पद्धतीने सुरू असलेल्या वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असताना या प्रकाराकडे दूर्लक्ष करण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जात असल्याने अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रवाशांच्या जिविताशी सुरू असलेल्या या खेळाला जबाबदार कोण असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शहरात बेकायदा वाहतुकीप्रमाणेच अनधिकृत रिक्षाही मोठ्या प्रमाणावर चालविल्या जात आहेत. परवाना नसणे, रिक्षांची दुरावस्था, इन्शुरन्स नसणे यासह अनेक बाबींकडेही पोलिसांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यातच या रिक्षा चालकांकडून प्रवाशांना होणारी दमबाजी, पीएमपीच्या बसस्थानकासमोर उभे राहून ओरडण्याची सुरू असलेली स्पर्धा, महिला प्रवाशांची होणारी हेळसांड याचा त्रास नागरिकांना होत आहे. अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.