पाचगणी -निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाचगणी व भिलार परिसरात बुधवारी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने अनेक ठिकाणी वृक्ष व विजेचे खांब पडले. भिलारमध्ये घरावरील पत्रे उडाले. पाचगणी परिसरात पहाटेपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वाई एमआयडीसी व पाचगणी रस्त्यावर विजेच्या खांबांवर झाडाच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. हा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी भर पावसात प्रयत्न करत होते. सकाळी साडेसातनंतर वाऱ्याचा व पावसाचा जोर वाढला. पाचगणीत भाजी मंडईत सिल्व्हर वृक्ष कोसळून नुकसान झाले. अर्हमनगर, मिस्त्री कंपाऊंड, न्यू इरा हायस्कूल रोड, बेबी पॉइंटजवळ, पॉवरहाऊस, भारती विद्यापीठ परिसरात वृक्ष व फांद्या पडल्याने मोठे नुकसान झाले.