प्रभात वृत्तसेवा पुणे – खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे भरल्याने शहरातील संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमधून गेल्या आठवड्यात तब्बल साडेसात टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने पानशेत आणि वरसगाव धरणांतून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग १६७० क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचा अंदाज असल्याने या चारही धरणांचा पाणीसाठा ८५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मुठा नदीवर ही चारही धरणे आहेत. त्यातील वरसगाव, टेमघर आणि पानशेत धरणांतून सोडलेले पाणी खडकवासला धरणात येते, आणि तेथून पुढे नदीत सोडले जाते. मागील आठवड्यात शनिवारी पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांचा पाणीसाठा ९२ टक्क्यांपेक्षा अधिक झाला होता. घाटमाथ्यावर आणि पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे मागील आठवड्यात रविवारी खडकवासला धरणातून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक २८ हजार क्यूसेक पाणी दोन दिवस सोडण्यात आले. त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतून केवळ वीज निर्मिती केंद्रासाठी पाणी सोडले जात आहे. नदीतील विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. धरणात ८५ टक्के पाणीसाठा.. मागील वर्षी धरणे भरल्यानंतरही पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यानंतर अचानक पावसाचा जोर वाढल्याने पानशेत, वरसगाव आणि खडकवासला धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागल्याने एकतानगरी, विठ्ठलवाडी, निंबजनगर, पाटील इस्टेट, राजपूत झोपडपट्टी परिसरात पूरस्थिती उद्भवली होती.म्हणून यंदा पाटबंधारे विभाग आणि महापालिकेकडून समन्वय साधून धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. तसेच, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज लक्षात घेऊन धरणांमधील पाणीसाठा ८५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात झाली तरी धरणातील पाण्याचा विसर्ग नियंत्रित ठेवणे शक्य होणार असून, पूरस्थिती नियंत्रणात राहणार आहे. असा आहे धरणसाठा -खडकवासला – ६० टक्के -पानशेत – ८९ टक्के -वरसगाव – ८९ टक्के -टेमघर – ९५ टक्के -एकूण – ८७ टक्के