‘दाल मे कुछ काला है’ ! आज ‘या’ गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान ; रोहित पवार म्हणाले, “आम्हाला रोखण्यासाठी सरकारची दडपशाही”

Rohit Pawar । राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण परभव झाल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली. त्याच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळून लावली. तरीदेखील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहेत. यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे.
मारकडवाडी या गावात प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. याच मुद्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवरजोरदार हल्लाबोल केला आहे. मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारकडून होत असलेली दडपशाही म्हणजे ‘दाल मे कुछ काला है’ असेच म्हणावे लागेल असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार? Rohit Pawar ।
या मतदानाविषयी बोलताना आमदार रोहित पवार यांनी,”माळशिरस मतदारसंघांतील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाचा घेतलेला निर्णय घेतला आहे. लोकशाहीसाठी हा अत्यंत आशादायी निर्णय असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे. उद्याची ही घडामोड ‘दूध का दूध-पाणी का पाणी’ केल्याशिवाय राहणार नाही” असे रोहित पवार म्हणाले. “दुसरीकडे हे सर्व होत असताना ही मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारकडून होत असलेली दडपशाही म्हणजे ‘दाल मे कुछ काला है’ असेच म्हणावे लागेल” अशी टीका देखील रोहित पवारांनी केलीय. “पण सरकार कितीही दडपशाही करत असले तरी लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत मारकडवाडी गावासोबत आणि आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्यासोबत आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत” असे रोहित पवार म्हणाले.
गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही गावात मतदान घेणारच Rohit Pawar ।
दरम्यान, गाव एकत्रित येऊन त्यांच्या खर्चाने बॅलेट पेपरवर जर मतदान घेत असेल तर शासनाला त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय असा सवाल करत मंगळवारी कुठल्याही परिस्थितीत ग्रामस्थ मारकडवाडी येथे मतदान करणारच असा इशारा नवनियुक्त आमदार उत्तम जानकर यांनी दिला. प्रशासनाने दबावात येऊन अंतरवाली सराटीप्रमाणे आमच्यावर लाठी हल्ला केला किंवा गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही गावात मतदान घेणारच असंही ते म्हणाले. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या ठिकाणी मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. पण प्रशासनाने त्याला विरोध करत गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यानंतर आमदार उत्तम जानकर हे मारकडवाडीमध्ये पोहोचले आहेत.





